मुंबई: राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
Thank you Honourable Prime Minister Shri @narendramodi ji for your good wishes for my speedy recovery!@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कालपर्यंत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना शरद पवार यांची अचानक इतकी काळजी का वाटू लागली, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. शरद पवार यांना राजकारणातील सर्वपक्षीय नेते मानत असले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता भाजप आणि राष्ट्रवादीतील जवळकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.