नगर (प्रतिनिधी) – करोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने प्रशासकीय पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. करोनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे ते मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी लॉकडाउन करण्याचा विचार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
संगमनेर, कोपरगाव, राहाता, पारनेर, श्रीगोंदे, नगर तालुका आदी तालुक्यातील जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी भेट देऊन करोना परिस्थितीची पाहणी केली. डॉ. भोसले म्हणाले, ‘‘करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तहसीलदार यांच्यासह सर्व यंत्रणेला सजग राहण्यास सूचना दिल्या आहेत.
प्रशासकी कामाचा व्याप थोडासा बाजूला ठेवून करोना प्रतिबंधकात्मक कामासाठी वेळ देण्याबाबत सूचित केले आहे. कोविड केअर सेंटर, कोविड चाचणी सेंटर कार्यन्वित केले आहेत. त्या बैठकीत प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधला असून, तशी यंत्रणा कार्यन्वित केली आहे.
अजूनही काही हॉटेल्स 50 टक्यापेक्षा जास्त क्षमतेने चालत आहेत. ते हॉटेल बंद करण्याची सूचना दिली आहे. आपल्याकडे लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आतापर्यंत एक लाख 20 हजार लोकांनी लस घेतली आहे. 67 टक्के लसीकरण झालेले आहे. 45 ते 60 व ज्येष्ठ नागरिक अशा 80 हजार लोकांनी लसीकरण केले आहे. तर, 50 हजार आरोग्य व प्रशासकीय कर्मचार्यांनी लस घेतली आहे.’’