पुणे – राज्य सरकारकडून प्राध्यापक भरतीचे केवळ गाजर दाखविल्याचा प्रकार होत आहे. सततच्या आश्वासनामुळे राज्यभरातील पन्नास हजारावर नेटसेट धारक प्रचंड अस्वस्थ आहेत. विद्यमान उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीच्या जागा तातडीने भरू, असे आश्वासन वर्षाभरानंतरही आश्वासनच राहिल्याचे दिसून येत आहे
गेल्या आठ वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंद आहे. सध्या राज्यात विविध महाविद्यालयांमधील 15 हजारावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. या पदावर भरती व्हावी म्हणून राज्यातील पन्नास हजारावर नेट-सेटधारक व पीएच.डी पदवी मिळवलेल्यांनी पाठपुरावा केल्यानंतर पाच वर्षांपूर्वी युती सरकारने चाळीस टक्के भरतीला मान्यता दिली. यामुळे भरतीची आशा निर्माण झाली होती, पण सरकारने प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही. उलट पुन्हा नवीन आदेश काढून भरतीला बंदी घातली. त्यामुळे नेट-सेट, पीएचडी उमेदवारांचा रोष वाढला आहे.
दरम्यान, करोनामुळे राज्यासमोरील आर्थिक संकट वाढले. यामुळे ही भरती थांबली. ही भरती तातडीने करावी म्हणून पुन्हा आंदोलन आणि पाठपुरावा सुरू झाला. गेले काही महिने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे “मंत्रालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबवत आहेत. प्रत्येक विद्यापीठात जाऊन तेथील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते जातील तेथे प्राध्यापकांच्या भरतीचा प्रश्न विचारला जात आहे. आर्थिक बाबीशी निगडित प्रश्न असल्याने लवकरच हा प्रश्न सोडवू असे आश्वासन ते देत आहेत. पण, प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही.
वित्त विभागाकडून आर्थिक कारणाने टाळाटाळ
राज्यात पहिल्या टप्प्यात अडीच हजार प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी झाला. पण, प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक बोलविली. पण करोनाचे कारण पुढे करत ती पुढे ढकलली. आर्थिक कारण पुढे करत या भरतीबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्राध्यापकांची 100 पदे भरण्याचे निर्दश असतानाही राज्य शासनाकडून ही कार्यवाही होत नाही. उच्च शिक्षण विभागाने नव्याने 201-18 या आकृतीबंधानुसार रिक्त पदांचा पुन्हा आढावा घेतला. मात्र, वित्त विभागाकडून अजूनही त्यास मान्यता मिळालेली नाही. आता नेट-सेट पीएचडी उमेदवारांचे आता अंत पाहू नये. तातडीने प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू करावी.
– प्रा. सुरेश देवढे-पाटील, समन्व्यक, नेट-सेट पीएचडीधारक संघर्ष समिती