पुणे : शहरात नव्याने सापडणाऱ्या बाधितांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने जवळपास 65 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण त्यांच्या घरीच विलगीकरणात राहत आहेत. मात्र, त्यानंतरही रुग्णालयांत बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून (दि.22) शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड केअर सेंटर महापालिकेकडून पुन्हा सुरू केले जाणार आहे.
याबाबतची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी दिली.आयुक्त कुमार म्हणाले, “गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जशी गंभीर परिस्थती निर्माण झाली होती, तशी स्थिती सध्या नाही. सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक असून ते घरीच राहून उपचार घेत आहेत.
असे असले, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व नियम पाळावेत. व्यापारी आस्थापनांनीही घालून दिलेल्या निर्देशानुसार कामकाज करावे. या साथीला अटकाव करण्यासाठी नियम पाळणे आणि खबरदारी बाळगणे आवश्यक असून सर्वांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.’