जिब्राल्टर – जगभरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र या संकटाच्या काळामध्ये जिब्राल्टर नावाच्या छोट्याश्या देशाने कमाल करुन दाखवलीय. आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्याचा पराक्रम या देशाने केलाय. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार जिब्राल्टर या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचे दोन डोस देण्यात आल्याचं हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं आहे.
हॅनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना, “मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की, जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे,” असं सांगितलं.
जिब्राल्टरची लोकसंख्या केवळ ३४ हजारांच्या आसपास आहे. या ठिकाणी चार हजार २६३ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. देशातील ९४ जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झालाय. या संकटाच्या प्रसंगी जिब्राल्टरच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचं मी कौतुक करतो, असं म्हणत हॅनकॉक यांनी जिब्राल्टरच्या नागरिकांचं कौतुक केलं. पुढे बोलताना हॅनकॉक यांनी, “ब्रिटीश देशांच्या समुहामध्ये असणाऱ्या या देशातील लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवण्यामध्ये सर्व देशांमधील सहकार्य मोलाचं ठरलं,” असंही सांगितलं.
जिब्राल्टरचे प्रमुख फॅबियन पिकार्डो यांनी लसीकरणासाठी यूनायटेड किंग्डम सरकारचे आभार मानले. पीपीई कीट, लसी आणि चाचण्यांसाठी लागणारी सर्व आर्थिक मदत ब्रिटनने आम्हाला केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं पिकार्डो म्हणाले. जिब्राल्टरमध्ये सध्या करोनाचे २६ रुग्ण असले तरी त्यापैकी १० जण परदेशी आहेत. जिब्राल्टर हा स्वतंत्र देश असला तरी त्यावर ब्रिटनचं नियंत्रण असल्याने येथील लसीकरणासाठी ब्रिटननेच मदत केली.
जिब्राल्टरमधील ही लसीकरण मोहीम यशस्वी झाल्याने इतर देशांचाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. स्पेन आणि इतर युरोपीयन देशांमध्ये एस्ट्राजेनेकाच्या लसीसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असतानाच जिब्राल्टरमधून आलेली ही बातमी दिलासा देणारी आहे. युरोपियन महासंघाची औषध नियामक संघटना असणाऱ्या युरोपियन मेडिसिन एजन्सीने एस्ट्राजेनेका ही करोना लस सुरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर इटली, फ्रान्स आणि इतर देशांनाही ही लस वापरण्यास सुरुवात केली आहे.