पुणे – एल्गार परिषदेत हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला अलिगड मूस्लीम विद्यापीठाचा नेता शर्जिल उस्मानी गुरुवारी पुण्यात दाखल झाला. स्वारगेट पोलीस ठाण्यात तो उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला.
याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ऍड. प्रदीप गावडे यांनी शर्जिलविरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानी याने भाषणात हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आणि त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शर्जिल याचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली होती. परंतु, तो मिळून आला नाही. उच्च न्यायालयात त्याने धाव घेतल्यानंतर याप्रकरणात उस्मानीवर कडक कारवाई न करता पुणे पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार यापूर्वीही तो स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन गेला होता. याप्रकरणी 22 मार्च रोजी त्याची पुढील सुनावणी होणार आहे.