दौंड, दि. 17 (प्रतिनिधी) -क्रिकेट मॅच पाहण्याच्या वादातून दौंडमधील तिघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलिसांना दिली.
या प्रकरणी नयन अविनाश गायकवाड (रा. खवटे हॉस्पिटल शेजारी, लिंगाळी रोड, दौंड) याने दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव पासलकर, अमित पासलकर, आकाश शिंदे, बाळू कडू, राहुल पासलकर (सर्व रा. पासलकरवस्ती, लिंगाळी, दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. 16) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी नयन गायकवाड त्याचा भाऊ सोहन गायकवाड व मित्र येथील जनता माध्यमिक शाळेच्या मैदानावर सुरू असलेली क्रिकेट मॅच पाहात उभे होते. त्यावेळी त्या ठिकाणी मॅच पाहात असलेला राहुल पासलकर हा आरडा ओरडा करीत होता त्यामुळे फिर्यादीचे भाऊ सोहन याने त्यास बाजूला थांब, आरडा ओरडा करू नकोस असे सांगितले असता तो सोहन यालाच उलटे बोलू लागला.
त्यावेळी सोहन याने थांब तुझ्या वडिलांनाच सांगतो असे म्हणताच राहुल तेथून रागाने निघून गेला. मॅच संपल्यानंतर फिर्यादी नयन गायकवाड, भाऊ सोहन व मित्र यांनी राहुल याच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना राहुल कसे चुकीचे वागला असल्याचे सांगत असतानाच त्या ठिकाणी अचानक 4 ते 5 युवक हातात लाकडी दांडके, बॅट घेऊन आले व त्यांनी फिर्यादी नयन गायकवाड व त्यांच्याबरोबर असणाऱ्या दोघांवर हल्ला चढविला.
या तिघांच्या डोक्यावर, छातीवर व पायावर त्या युवकांनी लाकडी दांडक्याने व बॅटने जोरदार प्रहार केले. तिघांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. यापैकी एकाच्या डोक्याला अंतर्गत मार लागला असल्याने त्यास तपासणीसाठी बारामतीला हलविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे दौंड शहर युवा अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी दिली आहे.