पुणे – “अरुण व त्याची पत्नी दोघे शहरी भागात माओवादी चळवळीचे काम करायचे, जंगलात त्याची व आपली भेट व चर्चा झाली. अरुण भेलके हा “राजन’ असून माओवादी नेता दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडेसोबत माओवादी चळवळीत काम करत होते,’ अशी साक्ष शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी कृष्णा दोरपटे याने न्यायालयात नोंदवली. तसेच त्याने न्यायालयात अरूण भेलके याला ओळखले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मार्च रोजी होणार आहे.
गडचिरोली येथील दोरपटे याची माओवादाच्या गुन्ह्यात अरुण भेलके प्रकरणात विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात बुधवारी साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्ज्वला पवार यांनी कृष्णाची सरपासणी घेतली. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. रोहन नहार काम पाहत आहेत. या वेळी त्याने स्वतः नक्षल दलात सक्रिय असताना जंगलात दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडेची भेट झाली. तेंव्हा शहरी भागात काम करणारे जानकी, समर व अन्य काही जण सोबत होते, असे त्याने सांगितले.
2014 मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने प्रतिबंधित माओवादी संघटनेचा सक्रिय सदस्य या आरोपाखाली अरुण भेलके व त्याची पत्नी कांचन ननावरे उर्फ भूमी यांना पुण्यातून अटक केली होती. कांचनचा काही महिन्यांपूर्वी आजारपणाने मृत्यू झाला. कृष्णाने न्यायालयासमोर कांचनचा फोटो ओळखला. दरम्यान, अरूणचे वकील रोहन नहार यांनी उलट तपासणी घेतली.
नहार यांनी “कृष्णा व आरोपीची भेट झालेली नसून, कृष्णा हा शरणागत नक्षलवादी असल्याने सरकारकडून मदत मिळेल या आशेने पोलिसांनी सांगितल्यानुसार जबानी देत असल्याचे म्हटले. तो एकेकाळी नक्षलप्रेमी असेल पण पत्नीच्या आजारपणामुळे तो 2011 पासून पुणे- मुंबई या ठिकाणी राहत आहे. त्याच्यावर पूर्वीचे प्रलंबित गुन्हे असल्यामुळे तो नाव बदलून राहतो म्हणजे, त्याचा या गुन्ह्याशी संबंध आहे हे म्हणणे चुकीचे आहे. त्याने कोणताही गुन्हा केला नसल्याचे व नक्षलवादी चळवळीत तो कार्यरत नव्हता,’ असे नहार यांनी न्यायालयाला सांगितले.