पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. नागपूर पाठोपाठ रुग्णवाढीमध्ये पुण्याने देखील आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र नागरिकांकडून प्रशासनाला सहकार्य मिळत नसल्याचे समोर आलं आहे. पुण्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथील एका १८ वर्षीय तरुणीने रात्री साडे अकराच्या सुमारास एरंडवडे येथील महिला सेवा मंडळाच्या क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु खिडकीच्या गजामधून पळून जाताना ही मुलगी गजामध्येच अडकली. त्यामुळे संपूर्ण प्रकार समोर आला. संबंधीत मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.
सविस्तर माहिती अशी की, रात्री साडेअकराच्या सुमारास क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न तरुणीने केला. त्यासाठी तिने खिडकीतून उडी मारून जाण्याचा मार्ग निवडला. मात्र खिडकीत बाहेर पडण्यासाठी जागा कमी होती. त्यामुळे तरुणी खिडकीत फसली. हा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने आग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकीचा गज तोडून तरुणीची सुटका केली. यावेळी तरुणी घाबरली होती. मात्र अग्निशमनच्या जवानांनी धीर देत तरुणीची सुटका केली.