पॅरिस – फ्रान्सने या आठवड्यात पहिल्यांदाच अवकाशात लष्करी अभ्यास सुरू केला. अंतराळातून होणाऱ्या हल्ल्यापासून फ्रान्सचे उपग्रह आणि इतर संरक्षण उपकरणांचे संरक्षण करण्याची क्षमता तपासून पाहण्यासाठी हा अंतराळातील युद्धसराव केला गेला. हा युद्धसराव म्हणजे एक क्षमता ताण चाचणी आहे, असे फ्रान्सच्या नव्याने तयार झालेल्या स्पेस कमांडचे प्रमुख मिशेल फ्रेडलिंग म्हणाले.
अशाप्रकारे अंतराळात युद्धसराव करणारे ते फ्रेंच सैन्यासाठी आणि युरोपमधील पहिलेच असल्याचे ते म्हणाले. या अंतराळातील युद्धसरावाचे कोड नाव “ऍस्टरेक्स’ असे आहे. फ्रान्सने 1965 साली अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.
या युद्धसरावांतर्गत ऑपरेशन रूममध्ये 18 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी कारवाईचा अनुभव घेतला जाणार आहे. या युद्धसरावामध्ये अंतराळातील धोकादायक पदार्थ, फ्रान्सच्या उपग्रहांना धोका असलेल्या परिस्थिती आणि अंतराळातून हल्ला करण्याची क्षमता असलेल्या विदेशी शक्तींचा सामना फ्रान्सच्या लष्कराला करावा लागणार आहे.
अमेरिकेची नवीन स्पेस फोर्स आणि जर्मनीची स्पेस एजन्सी फ्रेंच युद्धसरावामध्ये भाग घेत आहेत. या युद्धसरावाला सोमवारी सुरुवात झाली आणि तो शुक्रवारपर्यंत चालणार आहे. फ्रान्सच्या अंतराळ सुरक्षा दलाची स्थापना 2019 साली केली गेली आणि 2025 पर्यंत त्यामध्ये 500 तज्ञ सहभागी असणे अपेक्षित आहे.