मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले. वाझे जणूकाही ओसामा बिन लादेन असल्यासारखे चित्र निर्माण केले जातेयं. आधी फाशी आणि नंतर तपास अशा प्रकारची मागणी होत आहे. पण, ते होणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेले वाहन आढळले. त्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काही दिवसांनंतर ठाण्याच्या खाडीत आढळला.
हिरेन यांच्या मृत्यूवरून विरोधकांनी वाझे यांना संशयाच्या घेऱ्यात उभे केले आहे. त्यावर ठाकरे यांनी विधिमंडळाचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोषींवर कारवाई होईलच. वाझे पूर्वी शिवसेनेत होते. मात्र, आता त्यांचा शिवसेनेशी कुठलाही संबंध राहिलेला नाही, असे म्हणत त्यांनी दादरा नगर आणि हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजपवर निशाणा साधला.
आत्महत्येपूर्वी डेलकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत दादरा नगर आणि हवेलीचे प्रशासक प्रफुल्ला खेडा पटेल यांचे नाव आहे. ते पटेल आधी भाजपमध्ये होते, अशी टिप्पणी ठाकरे यांनी केली.