खासगी रुग्णालयांत कर्मचाऱ्यांना “को-विन ऍप’चे प्रशिक्षण देणार
पुणे – खासगी रुग्णालयांमधील करोना लसीकरणाचे अपॉइंटमेंट फुल्ल झाल्याचे दिसत असले, तरी बऱ्याच रुग्णालयांमध्ये अद्याप लसीकरणाला सुरूवातच झाली नसल्याची स्थिती आहे. खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांच्या “को-विन ऍप रजिस्ट्रेशन’च्या प्रशिक्षणानंतर येथे लसीकरणाला सुरूवात होणार आहे.
खासगी रुग्णालयांना लसीकरणाला परवानगी देण्यात येऊनही जवळपास एक आठवडा झाला आहे. मात्र, काही रुग्णालयांचे केंद्राच्या को-विन ऍपवर रजिस्ट्रेशन झाले नसल्याने त्यांच्याकडे लसीकरणाला सुरूवात झाली नाही. मात्र, काहींचे रजिस्ट्रेशन झाले परंतु त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऍपचे प्रशिक्षण मिळाले नव्हते. त्यामुळे तेथे लसीकरणाला सुरूवात झाली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत तेथे लसीकरण सुरू होईल, अशी माहिती सह आरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक यांनी सांगितले.
अन्य तीस-चाळीस रुग्णालयांचे गुगल शीट भरून घेतले आहे. त्यांच्याकडेही तत्काळ लसीकरणाला सुरूवात करण्यात येईल. काही रुग्णालयांमध्ये खाटा जरी कमी असल्या, तरी ज्या फिजिशियन्सनी मागणी केली आहे. त्यांना देण्यासंबंधीची विनंती केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळे अन्य तीन-चाळीस रुग्णालयांमध्येही आता लसीकरण लवकरच सुरू होईल, असे डॉ. नाईक यांनी स्पष्ट केले.
ज्या खासगी रुग्णालयांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, त्यांच्याकडे अपॉइंटमेंट सुरूवात झाली असून, अनेक रुग्णालयांचे महिनाभराचे बुकिंग फुल्ल झाल्याचे ऍपवर दिसून येत आहे. दिवसाला 100 लसीकरणाचे उद्दिष्ट असले, तरी ते वाढवता येऊ शकते.
रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन जरी झाले असले, तरी मंगळवारी कर्मचाऱ्यांचे ऍप हाताळणी प्रशिक्षण झाले, त्यानंतर बुधवारी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात झाली. रोजचे एक हजार लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. को-विन ऍपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर संबंधित लाभार्थीला रुग्णालयातही एक इंटर्नल अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. ज्यामुळे रुग्णालयात गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगही पाळले जाईल. तासाला 80 याप्रमाणे सकाळी 9 ते रात्री 9 असे नियोजन करण्याचा विचार आहे.
– डॉ. माधव भट, समन्वयक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय