दुर्दैवी ! राफेल कंपनीच्या मालकाचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

पॅरिस : फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अशणाऱ्या राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉ यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दसॉ हे फ्रान्सच्या संसदेचेही सदस्य होते. दसॉ हे सुट्ट्यांनिमित्त गेले असता रविवारी एका हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दसॉ यांच्यासोबतच या हेलिकॉप्टरमधील चालकाचाही मृत्यू झाला आहे. या दोघांव्यतिरिक्त हेलिकॉप्टरमध्ये इतर कोणीही नसल्याची माहिती समोर येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दसॉ यांना श्रद्धांजली अर्पण करताना, फ्रान्सची सतत सेवा करणारे व्यक्तीमत्व हरवल्याची भावना व्यक्त केली. दसॉ यांच्या खासगी हेलिकॉप्टरला नॉर्मंडी परिसराजवळ अपघात झाला. स्थानिक वेळेनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास) दसॉ यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती एएफपीच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

“ओलिवियर दसॉ यांचे फ्रान्सवर प्रचंड प्रेम होतं. त्यांनी उद्योजक, स्थानिक लोकनियुक्त अधिकारी, लोकप्रतिनिधी, वायूसेनेचे कमांडर म्हणून देशाची सेवा केली. त्यांचा अशाप्रकारे मृत्यू होणं हे देशाचं खूप मोठं नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि जवळच्या व्यक्तींप्रती सहानुभूती व्यक्त करतो,” असं मॅक्रॉन यांनी आपल्या ट्विटमध्ये दसॉ यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे.

६९ वर्षीय ओलिवियर दसॉ हे फ्रान्समधील उद्योगपती आणि अब्जाधीश असणाऱ्या सर्ज दसॉ यांचे पुत्र होते. ओलिवियर यांची कंपनीच जगप्रसिद्ध राफेल लढाऊ विमाने तयार करते. फ्रान्समधील संसदेचे सदस्य असल्याने राजकारण आणि उद्योग यांमध्ये एकमेकांचा प्रभाव पडू नये म्हणून त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळावरुन पदाचा राजीनामा दिला होता. २०२० च्या फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दसॉ यांना त्यांच्या भावंडासोबत ३६१ वं स्थान मिळाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.