इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची कधीही जाऊ शकते असे वातावरण विरोधकांच्या एकजुटीमुळे त्या देशात निर्माण झाले आहे. पाकिस्तानात इम्रान सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. आधीच अनागोंदी माजलेल्या पाकिस्तानात आता पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्चीच डळमळीत झाली आहे.
शनिवारी इम्रान खान यांना पाकिस्तानच्या संसदेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कारण पाकिस्तानचे अर्थमंत्री आणि इम्रान यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे अब्दुल हाफीज शेख यांचा सिनेट इलेक्शनमध्ये लाजिरवाणा पराभव झाला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि युसूफ रजा गिलानी यांनी शेख यांना पराभूत केले असल्यामुळे त्यांना आपल्या सरकारकडे बहुमत असल्याचे सिध्द करावे लागणार आहे.
खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी शेख यांचा प्रचार केला होता. त्यामुळे इम्रान खान यांना हा मोठा धक्का समजला जातो आहे. आणखी धक्कादायक म्हणजे गिलानी यांचा अवघ्या पाच मतांनी विजय झाला. पाकिस्तानातल्या मीडिया रिपोर्टसनुसार या सिनेट निवडणुकीत तीन मते बाद झाली त्यामध्ये पंतप्रधान इम्रान खान आणि दोन मंत्र्यांच्या मतांचा समावेश होता.
गेल्या काही काळापासून पाकिस्तानात इम्रान सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. बलुचिस्तान, सिंध वेगळे होण्याची मागणी करत आहेत. इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानातले सगळे पक्ष एकवटलेत. पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंट नावाची आघाडीही त्यांनी स्थापन केली असून सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यातच आता अर्थमंत्री अब्दुल हाफीज शेख यांच्या पराभवामुळे इम्रान खान यांची खुर्ची डळमळीत झालीय. विरोधकांनी इम्रान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.