सातारा | जिल्ह्यातील चार टोळ्यांमधील ‘हे’ 18 गुन्हेगार तडीपार

खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे करणाऱ्या चार टोळ्यांमधील 18 जणांना पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना यापुढेही कारवायांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामारी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या अमीर इम्तियाज मुजावर (रा. पिरवाडी, सातारा), अमीर सलीम शेख (रा. वनवासवाडी, सातारा), अभिजित राजू भिसे (रा. आदर्शनगरी, सैदापूर), जगदीश रामेश्‍वर मते (रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी), आकाश हणमंत पवार, सौरभ उर्फ गोट्या संजय जाधव (रा. सैदापूर, सातारा), शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या, चोरी, मारामाऱ्या करणाऱ्या टोळीतील सागर नागराज गोसावी, अर्जुन नागराज गोसावी, रवी नीळकंठ घाडगे (रा. यशवंतनगर, सैदापूर), विपुल तानाजी नलवडे (रा. वायदंडे कॉलनी, सैदापूर), अक्षय रंगनाथ लोखंडे (रा. सैदापूर), 

वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, सरकारी कामात अडथळा आणणे, ऍट्रॉसिटी असे गुन्हे दाखल असलेल्या रॉकी निवास घाडगे, कृष्णा निवास घाडगे, सनी निवास घाडगे (रा. लाखानगर, सोनगीरवाडी, वाई), कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गुन्हे दाखल असलेल्या आशिष अशोक पाडळकर, इंद्रजित हणमंत पवार, अनिकेत रमेश शेलार (रा. मलकापूर, कराड) व सुदर्शन हणमंत चोरगे (रा. कोयना वसाहत, कराड) यांना दोन वर्षासाठी तडीपार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात खुन, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, घरफोड्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांकडून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार त्या त्या पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर वेळोवेळी कारवाया केल्या होत्या. त्यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक करावाई करण्यात आल्या होत्या.

त्यानंतरही संबंधितांच्या वागण्यात काहीच बदल होत नसल्याने स्थानिक पोलीस ठाण्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते. त्यावर सुनावणी झाल्यानंतर अखेर बन्सल यांनी चार टोळ्यातील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. हे संशयित तडीपारीच्या काळात जिल्ह्यात दिसले, तर त्यांच्यावर कडक करावाई करण्याचे आदेश बन्सल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.