#INDvENG 4th Test : पंतच्या सुंदर खेळीने भारताचे वर्चस्व

पहिल्या डावात 7 बाद 294, महत्त्वपूर्ण 89 धावांची आघाडी

अहमदाबाद – प्रमुख फलंदाज पाठोपाठ बाद होत असताना यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दमदार शतक साकार केला. त्याला सुरेख साथ देताना वॉशिंग्टन सुंदरनेही नाबाद अर्धशतकी खेळी केली व इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्या डावात भारतीय संघाला 89 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 7 बाद 294 धावा केल्या आहेत. दिवसअखेर सुंदर 60 तर अक्‍सर पटेल 11 धावांवर खेळत आहेत.

गुरुवारच्या 1 बाद 24 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर रोहित शर्माने एक बाजू लावून धरली होती. मात्र, समोरून प्रमुख फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. चेतेश्‍वर पुजाराने 17 धावा केल्या पण स्थिरावल्यानंतरही तो बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने 8 चेंडू खेळले मात्र, त्याला बेन स्टोक्‍सने खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा रस्ता दाखवला. कोहलीला याही कसोटीत अपयशाचा सामना करावा लागला. त्यावेळी भारताची अवस्था 3 बाद 41 अशी बिकट बनली होती. रोहितचाच गाववाला मुंबईकर अजिंक्‍य रहाणेने संयमी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील अनावश्‍यक फटका खेळून बाद झाला. त्याने 27 धावा करताना रोहितसह चौथ्या गड्यासाठी 39 धावा जोडल्या. त्यानंतर पंतने रोहितला सुरेख साथ दिली.

या जोडीने पाचव्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली व संघाच्या धावसंख्येला शतकी टप्पा गाठून दिला. संयमी खेळी करणारा रोहित अर्धशतकाला केवळ एक धाव हवी असताना बाद झाला. गोलंदाजीसह उपयुक्त फलंदाजी करणारा रवीचंद्रन अश्‍विनही फार काळ टिकू शकला नाही.

यावेळी भारतीय संघ 6 बाद 146 अशा स्थितीत होता व संघ दीडशतकी मजल तरी मारेल का असा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, त्याचवेळी पंतला साथ देण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर खेळपट्टीवर आला आणि या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीला धिराने तोंड दिले. दरम्यान पंतने अर्धशतकी पल्ला गाठला. त्यानंतर त्याने आक्रमक खेळ केला. ब्रिस्बेन कसोटीपासून भरात आलेल्या पंतची सलग तीन शतके हुकली होती.
या सामन्यात मात्र, त्याने ही कसर भरून काढताना शतकही साकार केले. त्याने 101 धावांच्या खेळीत 113 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार व 2 षटकार फटकावले. पंतने सुंदरसह सातव्या गड्यासाठी 113 धावांची भक्कम भागीदारी केली.

त्यानंतर मात्र, पंत लगेचच बाद झाला. तरीही सुंदरने कोणतेही दडपण न घेता फलंदाजी केली. त्याने अक्‍सर पटेलला हाताशी घेत संघाला बळकटी प्राप्त करून दिली. त्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने पटेलसह आठव्या गड्यासाठी 35 धावांची अखंडित भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सुंदर 60 तर, पटेल 11 धावांवर खेळत असून आता भारतीय संघाकडे 89 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे.

या सामन्याचे अद्याप तीन दिवस बाकी असून भारतीय संघाने किमान दीडशतकी आघाडी घेतली तर त्यांना इंग्लंडला झटपट बाद करून डावाने विजय मिळवण्याची तसेच आयसीसी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश करण्याची नामी संधी आहे. इंग्लंडकडून जेम्स ऍण्डरसनने 40 धावांत 3 गडी बाद केले. त्याला योग्य साथ देताना जॅक लिच व बेन स्टोक्‍सने प्रत्येकी 2 बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड पहिला डाव – 205. भारत पहिला डाव – 94 षटकांत 7 बाद 294 धावा. (ऋषभ पंत 101, रोहित शर्मा 49, अजिंक्‍य रहाणे 27, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 60, अक्‍सर पटेल खेळत आहे 11, जेम्स ऍण्डरसन 3-40, जॅक लिच 2-66, बेन स्टोक्‍स 2-73).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.