मुंबई – नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 71व्या ऑनलाईन शिखर संमेलनात स्कॉच पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये “कार्पोरेट एक्सलन्स’ अंतर्गत “डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ यासाठी महापारेषणला सुवर्ण पारितोषिकाची घोषणा झाली. महापारेषण कंपनीने जॉईंट व्हेंचर उपक्रमाद्वारे अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर ओपीजीडब्ल्यू (ऑप्टिकल ग्राउंड वायर) नेटवर्क प्रस्थापित केले आहे.
या पारितोषिकाबद्दल ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. स्कॉच ग्रुपच्यावतीने दरवर्षी शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान, सांघिक नागरिकत्व, आर्थिक या क्षेत्रातील वाढीसाठी हा पुरस्कार दिला जातो. महापारेषणच्यावतीने नामांकन भरून पुरस्कार गुणांकन पद्धतीने मिळवला आहे.
महापारेषणचा ओपीजीडब्ल्यू प्रकल्प हा देशातील राज्य पारेषण उपक्रमाने राबविलेला सर्वात मोठा प्रकल्प असून त्याद्वारे अंतर्गत दूरसंचारणाची गरज भागवून अतिरिक्त फायबर भाडेतत्वावर दिल्यामुळे डिजिटल क्रांतीचा मार्ग सुकर होणार आहे. जादा महसुलाद्वारे पारेषण भाड्यामध्ये कपातीस मदत होणार आहे. महापारेषणच्या मनोऱ्यांवर मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सची दूरसंचार उपकरणेही बसविली आहेत. उपलब्ध साधन संपत्तीच्या सुयोग्य वापरामुळे हे शक्य झाले आहे, असे महापारेषणचे अभिनंदन करताना ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले.