मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
लोणावळा/पवनानगर – गर्भवती महिलेला त्रास जाणवत असताना तिच्यावर वैद्यकीय उपचार न करता मांत्रिकाकडे घेऊन जात तिच्यावर अघोरी उपचार केले. तिच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्या सासरच्या पाच जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील शिळीम या गावात ही घटना घडली.
दीपाली महेश बिडकर (वय 23) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचा भाऊ संतोष अशोक मगर (वय 27, रा. बऊर, ता. मावळ, जि. पुणे) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल दिली आहे. याबाबत महेश रघुनाथ बिडकर, रघुनाथ रामचंद्र बिडकर, जिजाबाई रघुनाथ बिडकर, मोहन रघुनाथ बिडकर, बकुळा मोहन बिडकर (सर्व रा. शिळींब ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बऊर येथे राहणाऱ्या दीपाली नावाच्या युवतीचा शिळीम येथील महेश रघुनाथ बिडकर यांच्याशी 17 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सासरचे लोक दीपालीला अनेक कारणावरून नेहमीच त्रास असत असे. तिच्या भावाने तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यातच दीपली ही आठ महिन्यांची गरोदर असताना तिला त्रास जाणवू लागल्याने तिच्यावर रूणालयात उपचार न करता तिला बाहेरील बाधा झाली आहे, असे सांगत गावातील एका मांत्रिक बाईकडे नेण्यात आले. मांत्रिक बाईच्या सांगण्याप्रमाणे सासरच्या मंडळींनी दीपाली हिच्यावर आघोरी उपचार करत उतारे टाकले. यातच दीपाली हिला अधिक त्रास होऊ लागल्याने सासरच्या मंडळींनी संबंधित बाब दीपालीच्या माहेरच्यांना कळविली.
दीपालीच्या पालकांनी विनवणी केल्यानंतर तिला तळेगाव जनरल रुग्णालयात 10 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने दीपालीचा उपचारादरम्यान रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेसंबंधी दीपालीच्या पालकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे यांच्याकडे दाद मागितल्यानंतर अंनिसच्या नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, पांडूरंग तिखे आदींनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर दीपालीचा पती महेश रघुनाथ बिडकर याच्यासह रघुनाथ बिडकर, जिजाबाई बिडकर, मोहन बिडकर, बकुळा बिडकर तसेच तांत्रिक महिला यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.