बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रींमधील एक जया बच्चन गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहेत. जया बच्चन यांना यापूर्वी रितूपर्ण घोष यांच्या ‘सनग्लास’मध्ये काम केले होते. त्यामध्ये त्यांनी नसिरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम केले होते.
मात्र हा सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता. मात्र आता तब्बल 7 वर्षांनंतर जया बच्चन रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. एवढेच नव्हे तर जया बच्चन प्रथमच मराठी सिनेमामध्ये काम करणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन गजेंद्र आहिरे करत आहे. हा सिनेमा केवळ 20 दिवसात तयार होणार आहे.
या सिनेमाचे बाकीचे तपशील अजून समजायचे आहेत. पण जया बच्चन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीने मराठी सिनेमात काम करणे हीच एक मोठी बातमी आहे. यापूर्वी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी मराठी सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून काम केले आहे.
फारच थोड्या हिंदी कलाकारांनी मराठी सिनेमात मध्यवर्ती भूमिका केली आहे. अर्थात जया बच्चन यांचा रोल गजेंद्र आहिरे यांच्या सिनेमात मध्यवर्तीच असण्याची शक्यता अधिक आहे. राजकीय कारकिर्दीमध्ये अधिक सक्रिय झाल्यापासून जया बच्चन यांनी अभिनयाकडे थोडे दुर्लक्ष केले. मात्र तरिही त्यांनी “कभी खुशी कभी गम’, “लागा चुनरी में दाग’ आणि “कल हो ना हो’ सारख्या सिनेमांमधून आपली छाप सोडली होती.