कोची – केरळातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका गटाने मार्क्सवादी कम्युनिस्ट आघाडीतून फुटून कॉंग्रेस प्रणित आघाडीत सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या गटाचे नेतृत्व आमदार मणि सी कप्पेन हे करीत आहेत. त्यांनीच आपला गट कॉंग्रेसमध्ये सामिल होत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली केरळात जी ऐश्वर्या केरळा ही यात्रा सुरू होत आहे त्यात आम्ही सहभागी होत आहोत. कप्पेन हे पाला मतदार संघातील आमदार आहेत. त्यांनी ही जागा डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून लढवली होती.
सन 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते निवडून आले होते. डाव्या आघाडीने ही जागा केरळ कॉंग्रेसच्या एका गटाला देण्याची घोषणा केल्याने त्यांनी हे बंड केले. केरळातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व परिवहन मंत्री ए. के. शशीदर्शन हे करीत आहेत. त्यांनी कप्पेन यांच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे.