मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आलेय. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नेहमीच शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात पुढे असलेले संजय राऊत यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय. तर नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिलीय.
”झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. एका वृत्तवाहिनीकडे एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेची या प्रकरणात ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले. पण संजय राऊत यांनी थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असे राऊत यांनी म्हटले. शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.