पुणे – गेल्या वर्षभरात पुण्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली असून ती 904 वरून 946 नोंदवली आहे. महापालिकेने केलेल्या जनजागृतीमुळे हा जन्मदर वाढल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.
पुणे महापालिका हद्दीत 2019 मध्ये मुलींचा जन्मदर 904 इतका होता. मात्र, करोनाकाळात (2020) त्यामध्ये 946 इतकी समाधानकारक वाढ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या लिंगगुणोत्तराच्या आकडेवारीत ही बाब पुढे आली आहे.
मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे. तसेच, मुलामुलींचे गुणोत्तर योग्य राखण्याच्या दृष्टीनेही जागृती सुरू केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने महिलांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे हा जन्मदर वाढलेला आहे.
अगदी आयटी कंपनी, शासकीय कार्यालये जेथे महिलांची संख्या जास्त आहे तेथेही जनजागृती केली. तसेच गर्भजल आणि गर्भलिंगनिदान तंत्र (नियमन व गैरवापर प्रतिबंध) कायदा याची प्रभावी अंमलबजावणी केल्याने हा जन्मदर वाढल्याचे महापालिकेच्या पीसीपीनडीटी विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांतील लिंगगुणोत्तर अहवाल
- वर्ष – लिंगगुणोत्तर प्रमाण
- 2016 – 932
- 2017 – 926
- 2018 – 927
- 2019 – 904
- 2020 – 946