नगर (प्रतिनिधी) – अहमदनगर महानगपालिकेच्या दोन मेगावॉट सौरवीजनिर्मिती प्रकल्पासाठी 10 कोटी आणि बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी विकास आराखड्यात 19 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिक येथे आज झालेल्या राज्यस्तर बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नगरमधील या वैद्यकीय सुविधांसाठी साकडे घातले. त्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी जागेवरच तरतूद करत जिल्हा प्रशासनाला हा निधी वितरित करण्याचे निर्देश दिले.
महापालिकेलच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची इमारत साधारण 70 वर्षे जुनी आहे. त्यात स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक झाल्याची बाब समोर आलेली आहे. त्यामुळे सामान्यांचे रुग्णालय असलेल्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयची इमारत पाडून तेथे नवीन अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आज जगताप यांनी ही मागणी लावून धरली.
महापालिकेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा विषय मंजूर झाल्यास त्यातून किमान दोन मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकेल. त्यातून नगरच्या अडचणी कमी होतील, अशी भूमिका आमदार जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडली.
महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातून शहरातील सामान्यांना वैद्यकीय सुविधा मिळतात. त्यात इमारत मोडकळीस आल्याने तिच्या दुरुस्तीची अत्यंतिक गरज होती. म्हणून निधीची मागणी लावून धरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तातडीने ही मागणी मान्य करत खास बाब म्हणून हा निधी दिला. आता चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहू. सौरऊर्जा प्रकल्पातून वीज मिळेल. त्याचा मोठा फायदा होईल.
आमदार संग्राम जगताप.