मुरादाबाद – उत्तर प्रदेशातील मुरादाबद येथे शनिवारी बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मिनी बस आणि ट्रकची धडक झाल्याने अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटणे कठीण झाले होते. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बस बिराली येथून मुरादाबादकडे येत होती. ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. मुरादाबाद येथील हायवेवर नानपुर गावाजवळ हा अपघात घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.
चौघांचा जागीच मृत्यू झाला होता तर सहा जणांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी मृत घोषीत केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी सकळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून दहा-अकरा जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मिनी बसमध्ये 30 जण होते. हे सर्व मुरादाबाद येथील एका फॅक्टरीत काम करणारे मजूर होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर तातडीने व मोफत उपचार करण्याचेही आदेश दिले आहेत. अपघात एवढा भीषण होता की मृत्यू पावलेल्यांची ओळख पटणे कठीण झाले होते.