वाघोली (पुणे) – केसनंद, भावडी, शिंदेवाडी येथील विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या दोन सराईतांना लोणीकंद गुन्हे शोध पथकाने वाघोली येथे पकडले आहे. त्यांच्याकडून 120 किलो तांब्याच्या तारा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
शिंदेवाडी येथे रस्त्याच्या कडेला असणारी विद्युत डीपी खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा आठ दिवसांपूर्वी दाखल झाला होता. लोणीकंद डीबी पथक वाघोली गावचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना परमेश्वर चांदप्पा नडगिरे (वय 22, रा. खांदवे नगर, वाघोली), बबलू लल्लुमिया उर्फ सहा (वय 27 रा. मगरवस्ती, लोणीकंद) हे दोघेजण दुचाकीवरून संशयित रित्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सामान घेऊन जात असताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्यांना थांबवून त्यांचेकडे चौकशी केली.
त्यावेळी त्यांच्याकडे विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा मिळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांनी भावडी, केसनंद, शिंदेवाडी, या ठिकाणाहून चोरून आणल्याचे सांगितले. त्यांच्याकडे 120 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व दुचाकी असा एकूण 90 हजारांचा माल मिळून आला आहे. त्यांच्याकडून लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील विद्युत डी पी चोरीचे एकूण 4 गुन्हे उघड झाले आहेत व आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, दत्ता गायकवाड, संजय नातू, राजेश कर्डिले, सुभाष गारे यांनी केली.