मुंबई – सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सर्वत्र चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने उघडे आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात कलाविश्वाला देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
दरम्यान, या आर्थिक संकटात सुद्धा दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिचा ‘मास्टर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एवढेच नाहीतर या चित्रपटाने रजनीकांत यांच्या सुपरहिट ‘दरबार’ चित्रपटाला सुद्धा मागे टाकले आहे. सुपरस्टार रजनीकांतचे भारतातच नव्हे तर जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत.
‘मास्टर’ने केवळ १५ दिवसांमध्ये ११३ कोटी रुपयांची कमाई केली असून, प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात ७० कोटी रुपयांची कमाई केली होती. विशेष म्हणजे तामिळनाडूतील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत मास्टरचा सातवा क्रमांक लागला आहे. सध्या कमाईच्या आकडेवारीत मास्टरने दरबाराला देखील मागे टाकलं आहे.