सोलापूर- जिल्ह्यातील अकरा लसीकरण केंद्रावर 1100 जणांना उद्या, शनिवारी लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. जिल्हा कृती दल समितीची आज बैठक झाली.
या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लसीकरण तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीस महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, जिल्ह्यातील अकरा केंद्रावरील सर्व आवश्यक व्यवस्था आज तपासून घेण्यात येणार आहे. नियुक्त कर्मचारी आणि लसटोचक यांना पुन्हा एकदा आवश्यक सूचना देण्यात द्याव्यात. लसीकरण केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असेल, आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. सर्व केंद्रावर इंटरनेटची व्यवस्था करण्यात यावी. वीज पुरवठा सुरळीत राहील याकडे महावितरण कंपनीने लक्ष द्यावे.
यावेळी पोलीस अधीक्षक सातपुते, शिवशंकर, स्वामी यांनी तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात आठ केंद्रावर तर शहरात तीन केद्रांवर प्रत्येकी 100 जणांना लस दिली जाणार आहे. लस दिली जाणाऱ्या प्रत्येकास लसीकरणाची वेळ कळवली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेत विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.