औरंगाबाद – गेल्या एक वर्षाच्या अवधीत औरंगाबाद महापालिकेने शंभर कोटी रूपयांचे कर्ज फेडले असून कंत्राटदारांची 140 कोटी रूपयांची देणीही या अवधीत अदा करण्यात आली आहेत अशी माहिती महापालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी आज दिली.
आयुक्त म्हणाले की मी या आयुक्तपदाचा कार्यभार एक वर्षांपुर्वी घेतला होता. त्यावेळी महापालिकेवर शंभर कोटी रूपयांचे कर्ज होते. कंत्राटदारांचेही देणे 286 कोटी रूपयांपर्यंत गेले होते. यातील काही रक्कम सन 2004 पासून प्रलंबीत होती. पण त्यातील निम्मी देणी आपण फेडली आहेत असे त्यांनी सांगितले.
आता सन 2018 पर्यंतची कंत्राटदारांची देणी देऊन झाली असून उर्वरीत कालावधींची देणीही लवकरच फेडली जातील असे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्ष संपायच्या आता आम्ही आणखी तीस ते चाळीस कोटी रूपयांची कंत्राटदारांची बिले अदा करू असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.