मुंबई –महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आहे. पुरुष गटाच्या स्पर्धेचे यजमानपद मात्र, यावेळी उत्तर प्रदेशने मिळवले आहे.
भारतीय कबड्डी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक ऑनलाइन स्वरूपात झाली असून या बैठकीत महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील यांनी महाराष्ट्राच्या यजमानपदासाठी सादरीकरण केले. मात्र, गेल्यावर्षी रोहा येथे पुरुषांची वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा झाली असल्याने यंदा पुरूषांच्या स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला देण्यात आले नाही पण महिलांच्या स्पर्धेचे यजमान देण्यात आले. कनिष्ठ गटाच्या दोन्ही स्पर्धा यंदा तेलंगणला होणार आहेत.
वरिष्ठ गटाची फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा विदर्भात तर, कनिष्ठ गटाची स्पर्धा आसाममध्ये होईल. उपकनिष्ठ गटाच्या दोन्ही स्पर्धा उत्तराखंडला तर, किनारी कबड्डी स्पर्धेचे यजमानपद आंध्र प्रदेशला देण्यात आले आहे.