पुणे(प्रतिनिधी) – तब्बल दहा महिन्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. दोन सत्रात हे कामकाज होत आहे. आता कामाला गती मिळण्याची न्यायालयीन घटकांची अपेक्षा आहे. सकाळी पक्षकार आणि वकिलांनी गर्दी केली होती. करोना काळापासून प्रलंबित असलेले दावे लवकरात लवकर निकाली निघाले पाहिजेत, अशी पक्षकार आणि वकिलांची अपेक्षा आहे.
मार्चपासून न्यायालयाचे कामकाज बंद होते. केवळ महत्त्वाच्या दाव्याची सुनावणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होत होती. मात्र, उच्च न्यायालयाने नुकतीच न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सकाळी 11 ते दीड आणि दुपारी दोन ते साडेचार या दोन सत्रात न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे.
मात्र, दोन्ही सत्राचे कामकाजाचे बोर्ड लावण्यात आल्याने न्यायालयाच्या आवारातही जास्त पक्षकार आले होते. तर नेहमीच्या तुलनेत अधिक वकील आले होते, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यांनी दिली. उद्यापासून कामकाजात अधिक सुसज्जता येईल. गर्दी आणखी आटोक्यत येईल, असेही ते म्हणाले.
नऊ महिन्यानंतर कॅंटीन उघडले….
न्यायालयाच्या आवारात कॅंटीन आहेत. चहा, नाष्टा, जेवन करण्यासाठी नेहमी तेथे पक्षकार, वकील गर्दी करतात. विशेषत: सुट्टीच्या वेळात जेवण्यासाठी तर तेथे प्रचंड गर्दी होत असते. मार्चपासून हे कॅंटीन बंद होते. ते आजपासून उघडण्यात आले. मात्र, पहिल्या दिवशी कॅंटीनमध्ये नेहमीच्या तुलनेत कमी गर्दी होती.