शिक्रापूर – शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आत शिेगेला पाहोचलेला दिसत आहे. उमेदवारासह कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला कसे भेटता येईल यासाठी जीवाचा आटापीटा करताना दिसत आहे. वॉर्ड क्रमांक दोन मधून शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचे उमेदवार आता चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रचार करताना पाहायला मिळाले. उमेदवारांना एकेका मताचे महत्त्व समजू लागल्याने मतदारही समाधान व्यक्त करीत आहेत. खऱ्या अर्थाने मतदार हा राजा असल्याचे येथे दिसते आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणूकमध्ये गावातील शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून गौरीताई दत्तात्रय राऊत, रेखाताई सचिन मांढरे व गौरव अरुणदादा करंजे हे तिघे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आपल्या शिक्रापूर ग्रामविकास आघाडी या पॅनलचा प्रचार सुरु केला आहे. या प्रचारामध्ये महिलांनीदेखील मोठी आघाडी घेतली आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक दोनमधून अनोख्या पद्धतीने या उमेदवारांनी सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेत ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आपला प्रचार सुरु केला आहे. या भागात शेतीचे क्षेत्र असल्याने अनेक मतदार कामासाठी शेतात जात असल्याने उमेदवारांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकरी मतदारांच्या गाठीभेटी घेत आपले मतदानरुपी आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे.
आज शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक दोनमधून काढलेल्या प्रचारसभेत जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, माजी ग्रामपंचायत सदस्या गिता चव्हाण, कविता जकाते, पायल गरुड, संजय भुजबळ, किशोर केवटे, सचिन मांढरे, राहुल शिंदे, तुषार चव्हाण, गौरव जाधव यांसह आदींनी विशेष सहभाग नोंदविला होता.
आज उमेदवारांनी चक्क शेतकरी मतदारांच्या शेतामध्ये चिखल तुडवत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्याने मतदारांनी देखील समाधान व्यक्त करत नक्कीच या उमेदवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी जेष्ठ मतदारांकडून मिळणारे आशीर्वाद नक्कीच आम्हाला विजयाकडे नेणार असल्याचा आशावाद शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.