लाहोर – पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसुद अझहर याच्याविरोधात गुरूवारी अटक वॉरंट जारी करण्यात आले. दहशतवादासाठी पैसा पुरवल्याच्या (टेरर फायनान्सिंग) आरोपावरून पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने ते महत्वपूर्ण पाऊल उचलले.
पंजाब प्रांत पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने मसुदच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली. ती मान्य करत न्यायालयाने मसुदला अटक करून हजर करण्याचा आदेश दिला. तो मूळचा पाकिस्तानातील बहावलपूरचा रहिवासी आहे. तिथेच त्याने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याचा अंदाज आहे.
आता तो केव्हा गजाआड होणार याची उत्सुकता आहे. मसुदच्या निर्देशावरून जैशच्या दहशतवाद्यांनी भारतात अनेक हल्ले घडवले. फेब्रुवारी 2019 मध्ये जैशने जम्मू-काश्मीरच्या पुलवामात भयंकर हल्ला घडवला. त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 40 जवान शहीद झाले. त्यामुळे जैशला धडा शिकवण्यासाठी त्याच महिन्यात भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून हवाई हल्ले केले.
त्यामध्ये जैशचा अड्डा उद्धवस्त झाला. भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे मागील काही काळापासून पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणे भाग पडले आहे. भारताच्या प्रयत्नांमुळे मसुदला संयुक्त राष्ट्रांनी याआधीच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.