मध्यप्रदेशातील ग्रामस्थांकडून राजस्थानमधील आदिवासी महिलांचे ‘अपहरण’

कोटा – मध्यप्रदेशातील ग्रामस्थांनी राजस्थानमधील 38 आदिवासी महिला आणि बालकांचे सामूहिक अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र, राजस्थान पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांत अपहृत महिला आणि बालकांची सुटका केली.

मध्यप्रदेशच्या सीमेलगत राजस्थानच्या हद्दीत काही आदिवासी कुटूंबे तात्पुरत्या तंबूंमध्ये राहतात. त्या कुटूंबांमधील पुरूष आपल्या दुचाक्‍या चोरत असल्याचा संशय मध्यप्रदेशातील ग्रामस्थांना आला. त्यामुळे आदिवासींना धडा शिकवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यातून 100 हून अधिक ग्रामस्थ बस, कार आणि दुचाकींवरून आदिवासी राहतात तिथे पोहचले.

आदिवासींवर जरब बसवण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्याबरोबर बंदुका, तलवारी, लोखंडी गज आणि काठ्याही घेतल्या. आदिवासी पुरूषांना धमकावण्याच्या इराद्याने ते गेले होते. मात्र, तिथे एकही पुरूष न आढळल्याने ग्रामस्थांनी जबरदस्तीने आदिवासी महिला, मुली आणि बालकांना बसमध्ये बसवले. त्यांना घेऊन ग्रामस्थ आपल्या मध्यप्रदेशातील गावाकडे निघाले.

सामूहिक अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी मध्यप्रदेशातील ग्रामस्थांचा पाठलाग सुरू केला. त्याची जाणीव झाल्यावर ग्रामस्थांनी आदिवासी महिला, मुली आणि बालकांना बसमधून उतरवून दिले.

त्यानंतरही पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवत कारमधून जाणाऱ्या सहा ग्रामस्थांना रोखले. त्यांना अटक करून त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. आता अपहरणाच्या कृत्यात सामील असलेल्या इतर ग्रामस्थांच्या अटकेसाठीही राजस्थान पोलीस प्रयत्नशील असल्याचे समजते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.