पुणे – मार्केट यार्डातील तरकारी विभागातही यावर्षी मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तरकारी विभागातील चार गटात मिळून 1 लाख 47 हजार 828 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख दादासाहेब वारघडे, दीपक थोपटे, दीपक टांगडे आणि आशिष राऊत यांनी ही कारवाई केली. गाळ्यापासून 15 फुटांच्या पुढे शेतीमालाची विक्री करणे, रहदारीस अडथळा करणारी वाहने आणि मास्क न वापरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
1 नोव्हेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. बाजाराला शिस्त लागावी, यासाठी बाजार समिती प्रशानच्या वतीने ही कारवाई करण्यात येते. गट क्रमांक 1 मधून गटप्रमुख दादासाहेब वारघडे यांनी 54 हजार 752 रुपये, गट क्रमांक 2 मधून गटप्रमुख दीपक थोपटे यांनी 16 हजार 992, गटक्रमांक 3 मधून दीपक टांगडे यांनी 14 हजार 868 आणि गटक्रमांक चारमधून आशिष राऊत यांनी 61 हजार 216 रुपयांचा दंड दंडात्मक कारवाई करून वसुल केला आहे.
गाळ्यापासून 15 फुटाच्या बाहेर फळे विक्री करण्यास विक्रेत्यांना मज्जाव करण्यात आले आहे. तरीही काही विक्रेते 15 फुटाच्या बाहेर जावून विक्री करतात. त्यांच्यावर आणि वाहतुकीस अडथळा येईल अशा ठिकाणी वाहने लावण्यात येतात. त्या वाहनांच्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. सध्या करोना संसर्गाची साथ सुरू आहे.
करोनापासून बचावासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. पोलीस ठिकठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिक, वाहन चालंकावर कारवाई करत आहेत. याच धर्तीवर बाजार आवारात बाजार समिती प्रशासनाच्या वतीनेही विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तरकारी विभागातही अशी कारवाई करण्यात येत असल्याचे विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी सांगितले.