पुणे (प्रतिनिधी) – रेल्वेच्या बॅटऱ्या चोरल्याप्रकरणात स्टेशन मास्तरचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान स्टेशन मास्तरसह अटक केलेल्या सात जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के.सोनवणे यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत पोलिसांना तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा जामीन दिला आहे.
स्टेशन मास्तर कौशल कुमार तिवारी (वय 52, रा. वाल्हेकरवाडी) याच्यासह सात जणांना जामीन मिळाला आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. श्रीकृष्ण घुगे यांनी जामिनासाठी अर्ज केला. 1 लाख 92 हजार 500 रुपयांच्या 55 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
इतर आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये देहुरोड स्टेशनच्या स्टेशन मास्तर तिवारी याचा सहभाग असल्याचे धक्कादायक उघड झाले होते. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी 25 डिसेंबर रोजी त्याला अटक केली. न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर तिवारी याच्यासह सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केले होते. ते न्यायालयाने मंजुर केले.