अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गुंडाळून लावला. त्यामुळे केंद्र राज्यातील संघषार्तून बुलेट ट्रेनचं काम लांबण्याची चिन्हं आहेत. त्यातच रेल्वे मंडळाचे अध्यक्षांनी जागा मिळण्यास विलंब झाल्यास फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचे संकेत दिले आहेत.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मागील आठवड्यात गुंडाळला. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याविषयी बोलताना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी म्हटले आहे की, बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत. महाराष्ट्र सरकारनं पुढील चार महिन्यात जमीन उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. अन्यथा बुलेट ट्रेन फक्त गुजरातपुरतीच धावेल, असं यादव म्हणाले.
बुलेट ट्रेनच्या स्थानकाला जर जागाच मिळाली नाही, तर बुलेट ट्रेन महाराष्ट्राऐवजी फक्त आणि फक्त गुजरातमध्येच धावेल, असं खुद्द रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनीच म्हटल्याने महाराष्ट्राचे बुलेट ट्रेनचे स्वप्न हवेत विरणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.