कोलकाता – तृणमुल कॉंग्रेस मधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले खासदार सुनिल मोंडल यांच्या विरोधात आज तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. त्यामुळे त्या परिसरात आज मोठा तणाव निर्माण झाला होता.
मोंडल हे भाजप कार्यालयाकडे येत असताना वाटेत तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात निदर्शने केली. त्यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. त्यांच्या गाड्यांवर दगडफेक करण्याचाही प्रकार झाला असा दावा भाजपचे खासदार अर्जूनसिंग यांनी केला.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांशी तृणमुल कार्यकर्त्यांची जोरदार हमरीतुमरीही झाली. तथापि पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून मोंडल यांच्या गाड्यांना मार्ग मोकळा करून दिला. अमित शहा यांच्या उपस्थितीत खासदार मोंडाल आणि पाच तृणमुल आमदारांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.
त्यांचा आज भाजपतर्फे सत्कार केला जाणार होता. तेथेच हा प्रकार घडला. या प्रकाराविषयी बोलताना तृणमुल कॉंग्रेसचे सौगाता रॉय म्हणाले की, लोकांचा या पक्षांतर करणाऱ्यांच्या विरोधात किती राग आहे हे या घटनेतून दिसून आले आहे.