श्रीनगर – जम्मू काश्मिरच्या शोपीअन जिल्ह्यात झालेल्या चकमकीत किमान दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती काश्मिर पोलिसांनी दिली. या अतिरेक्यांची ओळख तात्काळ पटू शकली नव्हती.
शोपिअन जिल्ह्याच्या कनिगम भगात शुक्रवारी सायंकाळी या चकमकीला सुरवात झाली. या भागात अतिरेकी लपले असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम राबवली. नाकाबंदी करून शोधमोहीम राबवण्यास सुरवात केली.
त्यावेळी अतिरेक्यांनी या पथकावर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्यूत्तर दिले. या चकमकीत दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक हवालदार जखमी झाला होता. केंद्रीय राखीव पोलिस दल पथकाच्या दिशेने दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकून अंधाधूंद गोळीबार केला होता. गुरूवारी झालेल्या अन्य एका चकमकीत जैश ए महंमदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.