तळेगाव दाभाडे येथे पोलीस कार्यशाळेत आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे प्रतिपादन
तळेगाव दाभाडे – पोलिसांनी कॅशलेश, पेपरलेश व तंत्रज्ञान पद्धतीचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा. पोलिसांच्या वैयक्तिक व कौटुंबिक समस्या सोडविल्याशिवाय पोलीस कर्मचारी कार्यक्षमपणे कर्तव्ये करणार नाही. पोलीस स्टेशनच्या ठिकाणी पोलिसांना मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पोलिसाचे मानसिक, शारीरिक व भावनिक आरोग्य मजबूत करण्यासाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करणार आहे. कामात आनंद शोधल्यावरच पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी (दि. 16) आयोजित पोलीस कर्मचारी समस्या व उपाययोजना कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सागर कवडे, सहायक पोलीस उपायुक्त संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, किशोर म्हसवडे, विलास सोंडे, प्रशिक्षक ओमकार गौरीधर, सामाजिक कार्यकर्ते संतोष परदेशी, बाळू शेडगे आदी कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले की, पोलीस प्रशासन एक कुटुंब असून, या कुटुंबातील प्रत्येक कर्मचारी महत्वाचा आहे. पोलिसांना स्टेशनरी, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वाढदिवसानिमित्त एक सुट्टी, बक्षिसाची नोंद, पोलिसांसाठी घरे आदी सुविधा सोडविणार. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आरोग्य सुविधा तसेच त्यांच्या पाल्यांना 18 वर्ष वयापर्यंत दर्जेदार शिक्षण आदि प्रश्न सोडविणार आहे.
या कार्यशाळेत प्रशिक्षक ओमकार गौरीधर यांनी प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेला तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड व शिरगाव-परंडवडी आदी पोलीस स्टेशन मधील कर्मचारी उपस्थित होते. सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कार्यशाळा संपन्न झाली. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी केले.