नवी दिल्ली : अभिनेता आणि भाजप नेता अशी ओळख असणाऱ्या सनी देओल यांना वाय श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती नुकतीच उघड झाली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले गेल्याचे सांगण्यात येत होते. परंतु आता खुद्द सनी देओल यांनीच याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.
कल से, कुछ गलत मीडिया रिपोर्ट्स है कि मुझे हाल ही में मुझे Y सुरक्षा मिली है। मुझे जुलाई 2020 से यह सुरक्षा प्रदान की गई है। इस सुरक्षा प्रावधान को चालू किसानों के आंदोलन से जोड़ने का प्रयास किया गया है जो गलत हैं।
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 17, 2020
आपल्याला वाय दर्याची सुरक्षा ही जुलै महिन्यातच मिळाली होती. त्याचा देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही असं त्यानं स्पष्ट केले. ‘कालपासूनच काही माध्यमांनी चुकीचं वृत्त दिलं आहे की, मला (Y) श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली. मुळात मला जुलै महिन्यातच ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या सुरक्षाव्य़वस्थेला देशात सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाशी जोडलं जात आहे जे अगदी चुकीचं आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
माध्यमांवर नाराजी व्यक्त करत देओल यांनी माहितीची पडताळणी करण्याचा सल्लादेखील त्यांनी दिल्याचे पाहायला मिळाले. ‘मी माध्यमांमध्ये असणाऱ्या माझ्या काही सहकाऱ्यांना विनंती करु इच्छितो की, कोणतेही वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याविषयीच्या माहितीची पडताळणी करा’, असा सूर त्यांनी आळवला. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार किम थ्रेट परसेप्शनमुळं गृहमंत्रालयाने सनी देओल यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली असून, याअंतर्गत त्यांच्यासोबत 11 जवान आणि 2 पीएसओ असणार असे म्हटले गेले होते.
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2020
दरम्यान, सनी देओल यांनी हल्लीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करत सरकार शेतकऱ्यांसमवेत असल्याचे म्हटले होते. ‘मी साऱ्या जगाला सांगू इच्छितो की, ही आमचे शेतकरी आणि सरकार यांच्यातील बाब आहे. यामध्ये तुम्ही पडू नका. चर्चेनंतर दोन्ही पक्षांकडून या वादावर तोडगा नक्कीच निघेल. मला ठाऊक आहे की, अनेकजण यातून आपला फायदा साधू पाहत आहेत. इतकंच नव्हे तर ते काही अडचणीही उभ्या करत आहेत. पण, या व्यक्ती शेतकऱ्यांबाबत विचार करत नाहीयेत. त्यांचा एक वेगळाच मनसुबा आहे’, असे ट्विट त्यांनी केले होते.