वेलिंग्टन – न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अॅण्डरसन याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता पुढील काळात तो अमेरिकेकडून खेळणार आहे. त्याची मैत्रीण अमेरिकन असून तिच्याच मध्यस्थीने त्याने अमेरिका क्रिकेट संघटनेशी संपर्क केला होता व त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अॅण्डरसन एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याने आता निवृत्तीनंतर अमेरिका टी-20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेनंतर तो अमेरिकेतच स्थायिक होणार असून पुढील काळात अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार असल्याचेही सांगितले जात आहे.
अॅण्डरसनने 49 एकदिवसीय, 30 टी-20 तसेच 13 कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात ऍण्डरसनने न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक झळकावताना केवळ 36 चेंडूत शतकी खेळी केली होती.