मुंबई – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व नवोदित वेगवान गोलंदाज टी. नटराजन यांच्या पदार्पणाबाबत एक आश्चर्यकारक योगायोग घडला आहे.
भारतीय संघात जेव्हा बुमराहची निवड झाली तेव्हा एक पर्यायी गोलंदाज म्हणून झाली. तेच नटराजनबाबतही घडले. या दोघांचे एकदिवसीय तसेच टी-20 क्रिकेटमधील पदार्पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच झाले. बुमराहने ज्या सामन्यात पदार्पण केले तो त्या मालिकेतील अखेरचा सामना होता.
नटराजननेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात पदार्पण केले. तसेच त्यांनी पदार्पण केलेले सामने भारताने जिंकले आहेत. दोघांनी एकदिवसीय पदार्पणातील सामन्यात दोन गडी बाद केले तर, टी-20 सामन्यातील पदार्पणात दोघांनी 3 गडी बाद केले.
दोघेही ठरले यॉर्करकिंग
या दोन्ही खेळाडूंमध्येही एक समान धागा आहे. या दोघांचीही गोलंदाजीची शैली अवे फ्रॉम बॉडी आहे. काहीशा राउंड आर्म शैलीने दोघेही गोलंदाजी करतात. या दघांच्याही भात्यात यॉर्कर हा क्रिकेटमधील सर्वात भेदक चेंडू आहे. तसेच असा चेंडू सातत्याने टाकण्याची दोघांचीही मोठी क्षमता आहे.