नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यासाठी वापरलेला चाकू आज पोलिसांनी हस्तगत केला. दरम्यान, घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांचा पोलीस शोध घेत असून, त्यांचा जबाब बाकी असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली.
रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्याप हाती लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी एलसीबीची पाच पथके कसून तपास करत आहेत. काल दुसऱ्यांदा त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात बोठे याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.
जरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने पाच पथके नियुक्त केली आहेत. जरे यांचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सागर भिंगारदिवे व हृषीकेश पवार या दोघा संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बोठे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवारी (दि. 30) रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. या हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे.
तसेच तपासात जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजयामाला माने यांचा जबाब बाकी असल्याचे पोलीस उपाधीक्षक पाटील यांनी सांगितले. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. तथापि, त्यांचा मोबाईल बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्यांच्याविषयी देखील संशय बळावला आहे.
दरम्यान, देशाबाहेर जाऊ नये, म्हणून संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविषयी पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे कोणत्याही विमानतळावरून तो देश सोडून बाहेर जाऊ शकत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.