पुणे – माहेरी आलेल्या पुर्वाश्रमीच्या प्रेयसीस भेटायला बोलावून केमिकल हल्ला करण्यात आला. या घटनेत संबंधीत तरुणीचा चेहरा व्रिदुप झाला आहे. ही घटना पर्वती दर्शन येथील भांबरे शाळेशेजारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधीत प्रियकराला अटक केली आहे.
अबुझर आय्याज तांबोळी (रा. पर्वती) याला अटक केली आहे. याबाबत 18 वर्षीय तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी फिर्यादी तरुणी व आरोपी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण काही महिन्यांपूर्वी तरुणीचा विवाह झाला. यानंतर तरुणी तिच्या पतीसह माहेरी सुट्टीसाठी आली होती. यावेळी आरोपीने काल तिला भेटण्यासाठी बोलावले. दोघे भांबरे शाळेजवळ भेटले. यावेळी तरुणीने त्याला आता तू माझ्या मागे लागू नकोस, माझे लग्न झालेले आहे, असे समजावून सांगत होती.
मात्र, अबुझर याने रागाच्या भरात तिच्याशी वाद घातला. तसेच तुझे अपने आप पर गुरुर है ना, देख मै तेरा गुरुर तोड देता हूँ, असे म्हणत तिच्यावर ऍसिडसारखे द्रव्य टाकले. यानंतर तो फरार झाला. तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडले.
दरम्यान, तरुणीवर उपचार सुरू असून, नेमके ऍसिड टाकले की, आणखी काही हे समजले नसून, डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती मिळेल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले.