आणखी गुन्हे उघड होणार
पुणे – अनलॉक आणि लगोलग दिवाळीमुळे पुणेकरांनी नातेवाईक आणि पर्यटनस्थळांकडे धाव घेतली. नागरिकांनी घराबाहेर पाय काढताच गुन्हेगारांनाही आयतीच संधी मिळाली आणि त्यांनी बंद घरे हेरत घरफोडीचा सपाटाच लावला. शहरातील जवळपास सर्वच भागांत घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वारजे, सिंहगड रोड, विश्रांतवाडी, मार्केटयार्ड ,मुंढवा या पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान, अशा गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
विश्रांतवाडी : अनिता टेकाळे (51, रा. विश्रांत हौसिंग सोसायटी) यांच्या घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला. यानंतर कपाटाततून 2 लाख 60 हजारांचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड असा 3 लाख 60 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करत आहेत.
धायरी :केशव शंकर रायकर (रा. रायकर मळा) यांच्या घरातून चोरट्यांनी 69 हजार 700 रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गोलांडे करत आहेत.
वारजे माळवाडी : विष्णू मुरलीधर पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी 97 हजार 500 रुपयांचे दागिने व रोकड चोरुन नेली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रायकर करत आहेत.
मार्केट यार्ड : रमेश कांबळे (गणेश मार्केट) यांच्या सदनिकेच्या सेफ्टी डोअरची कडी कापण्यात आली. यानंतर मुख्य दरवाजाचे लॅचलॉक तोडून चोरटे बेडरुममध्ये घुसले. यानंतर दागिने व रोकड असा
1 लाख 54 हजारांचा ऐवज चोरला.
मुंढवा : शिवलाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनलक्ष्मी स्वीट मार्टचे शटर उचकटून दुकानाच्या गल्ल्यातील 15 हजारांची रोकड व कोल्ड्रिंकच्या 15 बॉटल्स असा 17 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला. तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.
पौड रस्ता : याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सकाळी फिरायला बाहेर पडल्या. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा ओढून घेतला. चोरट्यांनी ही संधी साधून रोकड आणि दागिने असा 2 लाख 48 हजारांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक यशवंत पडवळे तपास करत आहेत.