कोपर्डे हवेली – ऊसतोडणी हंगाम सुरू होताच उत्तर कोपर्डेत अवैध दारूधंदे तेजीत आले आहेत. कराड ग्रामीण पोलीस मात्र जुजबी कारवाई करून शाबासकी मिळविण्यात व्यस्त आहेत. या दारूविक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांतुन जोर धरु लागली आहे.
जिल्हयात कोरोनाचा धोका कमी झालेला असला तरी टळलेला नाही. त्याअनुषंगाने अनोळखी व्यक्तींच्या व्यसनापायी संसर्गाला आमंत्रणच दिले जात आहे. परिसरात इतरत्र दारू मिळत नसल्याने येथे मद्यपींची गर्दी असते. उत्तर कोपर्डे परिसरात तीन ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहेत.
याबाबत ग्रामपंचायत व महिला मंडळांनी अवैध दारूधंदे व्यावसायिकांच्या नावासह पोलीस प्रशासनाकडे वारंवार निवेदन, पत्रव्यवहारातून केला आहे. दारु मुळे बरीच कुटुृंब रसातळाला गेली आहेत. तरीही याकडे पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करत अवैध दारुव्यावसायिकांना अभय देत येत असल्याने याचा अर्थ काय ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अवैध धंदेवाल्यांवर पोलीसांची जरब कमी होतेय का?
अवैध दारू व्यावसायिकांवर धाड टाकूनही दारुव्यवसाय पुन्हा चालू करण्यात येत आहे. त्यामूळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी होतोय का ? का या मागे काही गौडबंगाल आहे,असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
म्हणे… दारूसाठा दाखवा, कारवाई करतो…
ग्रामस्थांनी अवैध दारू व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले असता, पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनाच उलटे घेत तुम्ही दारूसाठा दाखवून द्या, आम्ही कारवाई करू असे सुनावल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.