जळगाव – आई- वडिलांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून ऐन भाऊबिजेच्या दिवशी बहिण-भावाने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भोलाणे (ता. जळगाव) येथे घडली आहे.
या घटनेत बहिण अश्विता विजय कोळी (वय 19) हिचा रूग्णलायत नेत असताना मृत्यू झाला. तर भाऊ विश्वजीत विजय कोळी (वय 21) याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन भाऊबिजेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे भोलाणेसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय कोळी हे निवृत्त एसटी वाहक आहेत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तीनही मुले शिक्षणासाठी उल्हासनगर येथे होते. विश्वजीत हा आर्किटेकचे शिक्षण घेत होता तर मोठा भाऊ देवेश आणि लहान बहीण अश्विता हे त्याच्यासोबत राहत होते. कोरोनामुळे लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर तिघेही उल्हासनगर येथून मुळ गावी भोलाणे येथे आले होते.
विश्वजीतला अभ्यासाचं नैराश्य आलं होतं. आई-वडिलांसोबत याच कारणावरून त्याचा वाद झाला. त्यानंतर त्याने शेतात जाऊन औषध फवारणीसाठीचे औषध प्राशन केले. त्याचवेळी दहा मिनिटांच्या अंतराने लहान बहिन अश्विता हिने देखील घराच्या बाहेर जाऊन विषप्राशन केले. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना दोघांनाही रूग्णालयात दाखल केले. मात्र अश्विता हिचा रूग्णालयात जाताना वाटेतच मृत्यू झाला. विश्वजीत याच्यावर शहरातील अॅपेक्स या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभ्यासाच्या नैराश्यातून विष प्राशन केल्याचे विश्वजीतने पोलिसाना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. मात्र अश्विताने का विष प्राशन केले याचे कारण कळाले नाही. श्वविच्छेदन करून अश्विताचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.