पुणे – राज्यातील लोणार सरोवराला “रामसर’ दर्जा मिळाला आहे. यासाठी मागील काही काळापासून प्रयत्न सुरू होते. अखेरीस लोणारदेखील “रामसर’ स्थळ म्हणून जाहीर झाले असून, हा निर्णय जैवविविधता संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पाणथळ क्षेत्रांच्या संवर्धनासाठी “रामसर’ परिषदे अंतर्गत जगातील महत्त्वाच्या पाणथळ स्थळांना “रामसर’ हा आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येतो. यापूर्वी ओडिशामधील चिल्का तलाव हे भारतातील पहिले, तर नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर हे राज्यातील पहिले “रामसर’ स्थळ घोषित केले होते. आता लोणार हे राज्यातील दुसरे “रामसर स्थळ’ ठरले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी याबाबतची माहिती दिली.
रामसर स्थळांचा दर्जा मिळालेल्या क्षेत्रांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीसह, क्षेत्राच्या जतन आणि संवर्धनाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय अभ्यासक, तज्ज्ञांची मदत मिळण्यासाठी हा दर्जा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे अभ्यासक सांगतात. पाणथळ क्षेत्राला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ते क्षेत्र “रामसर स्थळ’ म्हणून घोषित होणे आवश्यक असते.
असे आहे लोणार सरोवर
लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. बेसॉल्ट खडकावर उल्का पडल्याने तयार झालेले एकमेव सरोवर आहे. या सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती असून सरोवर 137 मीटर खोल आणि 1.8 किलोमीटर रुंद आहे. तर याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवरातील पाण्यात निळे-हिरवे शेवाळ असल्याने ते खाण्यासाठी रोहित (पक्षी) येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.