कराची – वर्ष 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी -20 विश्वचषक पार पडेपर्यंत पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून युनूस खानची नियुक्ती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केली आहे. नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळी युनूसच्या भूमिकेबद्दल आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पीसीबीने म्हटले आहे. त्यामुळे हा करार विस्तारीत करण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी वसीम खान म्हणाले, युनूस आता आमच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कमीतकमी पुढील दोन वर्षे साथ करेल याचा मला आनंद आहे. इंग्लंडमध्ये अल्पावधीत त्याच्या प्रभावाबद्दल आम्हाला मिळालेला अभिप्राय उत्कृष्ट होता. त्यांचे कार्य नैतिकता,
वचनबद्धता आणि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असून मला खात्री आहे की त्याच्या नियुक्तीमुळे अनेक प्रतिभावान फलंदाजांना फायदा होईल.
युनूस कराची येथील हाय परफॉरमेंस सेंटरमध्ये काम करेल, तिथे त्याच्याबरोबर आणखी एक पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद युसुफ सामील होईल. हे दोघेही जण स्थानिक फलंदाजांना त्यांचे कौशल्य वाढविण्यात मदत करतील.
पाकिस्तानसाठी खेळताना युनूसने 118 कसोटी सामन्यांमध्ये 10,099 धावा केल्या असून त्यामध्ये कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 313 धावांच्या खेळीचा समावेश होता. आयसीसी क्रमवारीत तो जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाजही ठरला आहे. 2009 मध्ये त्याने पाकिस्तानला पहिल्या ट्वेंटी -20 विश्वचषकात विजय मिळवून दिला होता. दरम्यान, पीसीबीने माजी कसोटी फिरकीपटू अरशद
खानला महिला संघाची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून एका वर्षासाठी नियुक्त करत असल्याचे जाहीर केले.