ढाका – बांगलादेशचा माजी कर्णधार हबीबुल बशर जीवघेण्या भयानक अशा कोविड -19 साठी पॉझिटिव्ह सिद्ध झाला असून सध्या तो घरातच विलगीकरण कक्षात रहात आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला कसोटी कर्णधार मोमिनुल हक आणि अष्टपैलू महमूदुल्लाह रियाद करोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर बाशरला झालेली लागण हा चर्चेचा विषय ठरला असून बशर हे सध्याच्या राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख आहेत.
बशर यांनी बांगला ट्रिब्यूनला सांगितले की, मी खरोखर काळजी घेतो, पण तरीही मला संसर्ग झाला. आम्ही काहीही करू शकत नाही. व्हायरस कुणालाही गाठू शकतो, याची जाणीव सर्वांनाच आहे. सोमवारी मला ताप आला आणि नंतर तो 102 अंशांवर पोहोचला. तो मंगळवारपर्यंत चालू राहिला, म्हणून मी बुधवारी सकाळी तपासणी केली आणि संध्याकाळी माझी चाचणी पॉझिटीव्ह आली.
आपल्या देशासाठी 50 कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणारे बशर हे 48 वर्षीय खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर प्रशिक्षण आणि सामन्यांमध्ये नियमितपणे काम करत होते. या महिन्याच्या अखेरीपर्यंत ते बरे होण्याची आशा आहे. कोविड – 19 मधून बरे झालेल्या बांगलादेशातील काही खेळाडू म्हणजे मशराफी मुर्तझा, अबू जयद आणि सैफ हसन होत.